औरंगाबाद: गत वर्षीच्या दुष्काळाच्या सावटात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीही वरुणराजाने दिलासा दिलेला नाही. लातूर विभागात पावसाअभावी आतापर्यंत फक्त ३५ टक्के पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. सर्वात गंभीर परिस्थिती लातूर जिल्ह्यात आहे या जिल्ह्यात अवघ्या २२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या मानाने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात पेरण्यांना वेग आला असून ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.
गतवर्षी मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट होते. अनेक भागात तर खरिपाची पेरणी होऊ शकली नाही. तर औरंगाबाद -जालना जिल्ह्यात दुबार, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्नच लागले नाही. सततच्या दुष्काळाने या दोन्ही जिल्ह्यातील शेती अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. या वर्षी तरी चांगल्या पावसाने शेतकऱ्यांची अडचण दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र लांबलेला मान्सून कमी अधिक पडणाऱ्या पावसाने मराठवाड्यातील खरिपाची स्थिती जेमतेमच आहे. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यात त्यामानाने बरा पाऊस पडला. औरंगाबाद जिल्ह्यात ६२ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर बीड आणि जालना जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. दुसरीकडे लातूर विभागाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पाऊसच नसल्याने लातूर जिल्ह्यात अवघ्या २२ टक्के पेरण्या आतापर्यंत पूर्ण होऊ शकल्या आहेत. उस्मानाबाद ३४ टक्के, नांदेड ३९, परभणी ३४ तर हिंगोली जिल्ह्यात एकूण पन्नास टक्के पेरण्या आतापर्यंत होऊ शकल्या आहेत.
मराठवाड्यात सरासरी ४८ टक्के पेरण्या
मराठवाड्याचा विचार करता आतापर्यंत केवळ ४८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी कडधान्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. सूर्यफुलाची पेरणी ही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, भुईमूग यासह तूर आणि कपाशीचे क्षेत्र वाढले असल्याचे दिसून येते. लातूर विभागातील पाच जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. लातूर जिल्ह्याला मोठ्या पावसाची अपेक्षा असून अजून ७८ टक्के पेरण्या शिल्लक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातही अवघ्या ३४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. परभणी, नांदेड जिल्ह्याला ही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.